Ad will apear here
Next
के. आर. नारायणन, उर्मिला मातोंडकर


भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा चार फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
........
के. आर. नारायणन
कोचिरील रामन नारायणन उर्फ के. आर. नारायणन यांचा जन्म चार फेब्रुवारी १९२१ रोजी झाला; मात्र कागदोपत्री ती तारीख चुकून २७ ऑक्टोबर १९२० अशी नोंदवली गेली. तीच पुढे कायम ठेवण्यात आली. केरळमधील उझवूर या लहान खेड्यात एक दलित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत हलाखीत गेले. त्या परिस्थितीत दररोज पायी १५ मैल चालत जाऊन नारायणन यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केल्यानंतर ते पत्रकारितेचे शिक्षण घेऊन ‘हिंदू’ या दैनिकात वार्ताहर म्हणून काम पाहू लागले. याच काळात १९४४-४५ च्या दरम्यान वार्ताहर म्हणून गांधीजींना भेटण्याचा योग आला आणि गांधीजींच्या विचाराने ते एवढे भारावून गेले की ते अंतर्बाह्य गांधीवादी बनले. पुढे गांधीजी यांनी आणि जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्या युरोपातील शिक्षणासाठी मदत केली. डॉ. आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेवून त्यांनी ‘London School of Economics’ या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेऊन त्यांनी अर्थशास्त्राची पदवी प्रो. हेराल्ड लास्की यांच्या मार्गदर्शनाखाली संपादन केली. याच शिक्षण संस्थेत डॉ.आंबेडकर यांनी देखील अर्थशास्त्राची पदवी संपादन करून डॉक्टरेट मिळवली होती. 

इंग्लंडमधील वास्तव्यात व्ही. के. कृष्ण मेनन हे त्यांचे सहकारी होते. त्यांच्यासोबत इंडिया लीगमध्येही त्यांनी सहभाग घेतला. तेथील शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रो. लास्की यांनी नेहरूंना नारायणन यांची शिफारस करणारे पत्र लिहिले होते. भारतात परतल्यावर त्यांनी नेहरूंची भेट घेतली आणि नेहरूंच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले. नेहरूंनी त्यांची नियुक्ती स्वत:च्या खात्यातील परराष्ट्रसेवेत केली. टोकियो, लंडन, बँकॉक, हनोई येथे त्यांनी भारतीय राजदूत म्हणून काम पहिले. त्यांचे कार्य पाहून नेहरूंनी १९५५ साली त्यांचा गौरव ‘The Best Diplomat of the Country’ असा केला होता!

ब्रह्मदेशात राजदूत म्हणून कार्यरत असताना त्यांची ओळख ‘मा तिंत तित’ या तरुणीशी झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन विवाह झाला आणि त्याच पुढे ‘उषा नारायणन’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या! अमेरिकन दूतावासात त्यांनी १९८० ते १९८४दरम्यान कार्य केले. भारतात परतल्यावर त्यांनी जवाहर नेहरू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काही काळ कार्य केले. इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला व १९८४ सालातील सार्वत्रिक निवडणुकीत ते ओट्टपालम या केरळमधील मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदही भूषविले! 
त्यानंतर १९८९ आणि १९९२ सालीदेखील ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. त्याच वर्षी म्हणजे १९९२ साली, शंकर दयाळ शर्मा यांच्या राष्ट्रपतिपदाच्या काळात ते उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले आणि पुढे १९९७ साली टी. एन. शेषन यांचा पराभव करून ते राष्ट्रपती झाले. नारायणन राष्ट्रपतिपदी निवडून आले त्या वर्षी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल हे होते. हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल १५ ऑगस्ट १९९७ रोजी भाषण करताना म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले. कारण दलित कुटुंबातील के. आर. नारायणन राष्ट्रपती झाले आहेत.’ 

राष्ट्रपतिपदावर असताना त्यांनी राष्ट्रपती म्हणजे समारंभाचे मानद पद ही ओळख पुसून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यापूर्वीचे राष्ट्रपती मतदान करणे टाळत असत; मात्र नारायणन यांनी १९९८च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करून मतदान न करण्याची प्रथा मोडीत काढली!

‘घटनेच्या चौकटीत कार्य करणारा सक्रिय राष्ट्रपती’ अशी त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. राष्ट्रपती त्यांना असणारे अधिकार वापरून सरकारवर दबाव निर्माण करू शकतो, हे के. आर. नारायणन यांनी दाखवून दिले. के. आर. नारायणन यांचे नऊ नोव्हेंबर २००५ रोजी निधन झाले.
..........


उर्मिला मातोंडकर
चार फेब्रुवारी १९७४ रोजी उर्मिला मातोंडकरचा जन्म झाला. ‘मासूम’ चित्रपटातील ‘लकडी की काठी... काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी उर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण ‘मासूम’मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने १९८० साली ‘कलयुग’ नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. 

१९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरुणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी केली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित द्रोही, रंगीला, मस्त, भूत, सत्या, कौन, दौड ही नावेच तिच्या विविधतेचा प्रत्यय देतात. त्याशिवाय एक हसीना थी, जुदाई, पिंजर अशाही काही चित्रपटांतूनही तिने अभिनय केला आहे. हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. 

उर्मिला मातोंडकरने ‘आजोबा’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले आहे. मोहसीन अख्तर मीर हा उर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. मोहसीनने २००७मध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर इंडिया टॅलेंट हंटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. ए. आर. रेहमानच्या ‘ताज महल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसीनेन काम केले होते. 

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उर्मिलाने काँग्रेस पक्षाकडून मुंबईतून निवडणूक लढवली होती; मात्र ती निवडून येऊ शकली नाही. त्यानंतर काही कालावधीने तिने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZYACJ
Similar Posts
राम गणेश गडकरी, डी. एस. खटावकर, पं. दिनकर कैकिणी नामवंत लेखक, कवी, नाटककार राम गणेश गडकरी, ख्यातनाम शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर आणि आग्रा घराण्याचे गायक पं. दिनकर कैकिणी यांचा २३ जानेवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
अशोक समेळ, मिलिंद इंगळे, स्मिता सरवदे-देशपांडे, शेख मुख्तार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ, प्रसिद्ध संगीतकार व गीतकार मिलिंद इंगळे, प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता सरवदे-देशपांडे यांचा १२ मे हा जन्मदिन. तसेच, बॉलीवूडचे पहिले ‘माचो मॅन’ अभिनेते शेख मुख्तार यांचा १२ मे हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
नंदू भेंडे, जेम्स पार्किन्सन, शुभांगी अत्रे-पुरी मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे यांचा ११ एप्रिल हा स्मृतिदिन. तसेच, पार्किन्सन्स डिसीजचा शोध लावणारे ब्रिटिश डॉक्टर जेम्स पार्किन्सन आणि अभिनेत्री शुभांगी अत्रे-पुरी यांचा ११ एप्रिल हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language